जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युवा खेळाडूंना फुटबॉलचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या वतीने यंदाच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव येथील पोलीस मुख्यालय फुटबॉल मैदानावर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी वयाची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. १५ वर्षांखालील मुले (जन्म १ जानेवारी २०११ नंतर) तसेच १७ वर्षांखालील मुले व मुली (जन्म १ जानेवारी २००९ नंतर) या गटांमध्ये खेळाडू सहभागी होऊ शकतील.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी स्पर्धेची प्रवेशिका आणि खेळाडू ओळखपत्र ऑनलाइन पद्धतीने तयार करणे बंधनकारक आहे. स्पर्धेच्या वेळी खेळाडूंच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मदाखला, आधारकार्ड/पासपोर्ट यांची मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी केलेली प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. या कागदपत्रांशिवाय स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही. विशेषतः, सन २०२५-२६ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या पण अजून रजिस्टर नंबर न मिळालेल्या खेळाडूंनी ओळखपत्रात ‘नवीन / NEW’ असे नमूद करून ११ वी प्रवेशाच्या फी भरलेल्या पावतीची सत्यप्रत ओळखपत्रासोबत जोडणे अनिवार्य आहे.
संघ नोंदणीची अंतिम मुदत ८ जुलै २०२५ असून, https://dsojalgaon.co.in/school/login.php या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. याशिवाय, www.subrotocup.in या सुब्रतो स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही संघ व खेळाडूंची नोंदणी आणि प्रवेश फी भरणे बंधनकारक आहे. केवळ नोंदणीकृत आणि प्रवेश फी भरलेले संघच स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. निर्धारित तारखेनंतर आलेल्या कोणत्याही प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.