सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील मर्चंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अखेर मुख्य व्यवस्थापक रविंद्र रमेश वाणी याला सव्वा वर्षाच्या फरारीनंतर पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, अनेक ठेवीदार आणि सभासद आर्थिक संकटात सापडले आहेत.
सावदा पोलीस ठाण्यात १० एप्रिल २०२३ रोजी भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१ व ४७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांत वाणी यांनी संस्थेच्या सहा कर्जदारांकडून एकूण ₹८.५० लाख रुपये (मुद्दल व व्याजासह) वसूल करून बनावट पावत्या आणि दाखले तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम संस्थेच्या बँक खात्यात न भरता त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्याची गंभीर बाब तपासात समोर आली आहे.
तसेच, संस्थेच्या महत्त्वाच्या नोंदी आणि कागदपत्रे वाणी यांनी स्वतःकडेच ठेवली होती आणि प्रशासकांना सुपुर्द न केल्यामुळे त्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने वाणी यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने तो जवळपास एक वर्ष फरार होता. अखेर, सपोनि विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल सानप, पोउनि अमोल गर्जे, पोह उमेश पाटील, पोह निलेश बाविस्कर, पोकॉ मयूर पाटील व मपोकॉ गीता कदम यांच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे रसलपूर येथून त्याला अटक केली.
अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संस्थेचे तत्कालीन संचालक आणि काही माजी पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. संचालक मंडळाने ऐपत नसलेल्या लोकांना भरमसाठ कर्जवाटप केल्याचे आणि स्वतःच काही प्रकरणांमध्ये जामीनदार किंवा नातेवाईक म्हणून सहभागी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
काही प्रकरणांत तर बनावट तारण कागदपत्रे तयार करून बोगस बोजा दाखवण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या सर्व प्रकारांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींविरोधात लवकरच कठोर कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिस तपास पथकाने दिली आहे.
या प्रकरणात ज्यांचे पैसे संस्थेने परत दिलेले नाहीत अशा ठेवीदारांनी तातडीने सावदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तपासादरम्यान आणखी गंभीर आर्थिक अनियमितता समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.