डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून, येथील डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने १ जुलै रोजी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. पर्यावरण संवर्धन आणि कृषी क्षेत्रातील जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे, डॉ. ललित जावळे, प्रा. संदीप पाऊलझगडे, पंकज मोरे, आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नामदेव डी. पाटील यांच्यासह सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. ललित जावळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कृषी दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची त्यांनी आठवण करून दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे यांनी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाचे कौतुक केले. भविष्यातही अशाच समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. स्वयंसेवक जगताप यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या वृक्षारोपणामुळे महाविद्यालयाच्या परिसरात हिरवळ वाढण्यास मदत झाली, तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.