Home Cities भुसावळ विद्यार्थ्यांना ‘श्रीखंड-पूरी’चा महाप्रसाद ; ४० विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप

विद्यार्थ्यांना ‘श्रीखंड-पूरी’चा महाप्रसाद ; ४० विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप

0
12

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भगवान श्री नित्यानंद गुरुदेवांच्या ६५व्या पुण्यतिथीनिमित्त महादेव माळ, ता. भुसावळ येथे  जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अन्नदान व शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. ‘ॐ सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ’च्या वतीने सलग आठव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना श्रीखंड, पुरी व बटाट्याच्या भाजीचा महाप्रसाद देण्यात आला. तसेच ४० गरजू विद्यार्थ्यांना नवीन दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

तिथीनुसार आषाढ द्वादशी, दिनांक ८ ऑगस्ट रोजी हा उपक्रम जिल्हा परिषद शाळा, महादेव माळ, ता. भुसावळ येथे उत्साहात पार पडला. ‘प्रत्येक प्राण्याला दुपारी १२ वाजता अन्न मिळालेच पाहिजे’ या सेवाभावी विचारातून अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात भक्तीमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.

अन्नदानासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने ४० गरजू विद्यार्थ्यांना नवीन दप्तरांसह आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन दप्तर व अभ्यासाचे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व उपस्थितांनी अधोरेखित केले. यावेळी भगवान श्री नित्यानंद गुरुदेवांच्या सेवाभावी विचारांचे स्मरण करण्यात आले. सौ. उज्वल कुंटे लिखित ‘आपले बाबाजी’ या पुस्तकातील २७व्या पाठाचा संदर्भ देत अन्नदानाचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. अन्नदान हे मानवसेवेचे पवित्र कार्य असून, त्यातून गरजूंच्या जीवनात समाधान निर्माण होते, असा संदेश यावेळी देण्यात आला. गुरुदेवांनी सुरू केलेल्या बालभोजन व साधू भोजनाच्या सेवाभावी परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जात असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमातील भोजनाची संपूर्ण जबाबदारी तळवेल येथील चेतनभाऊ झोपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली. त्यांनी चवदार व उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक निलेश पाटील, सहशिक्षिका मीनाक्षी पाटील, तुकाराम पाटील, वैशाली पाटील, डॉ. नितु पाटील, डॉ. रेणुका पाटील, राहुल माळी, अनिकेत चव्हाण, राम शेटे, विवेक पाटील, चेतन झोपे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य तोषल पाटील, चिरंजीव वेदांत, चिरंजीव दुर्वांग, दीपक फेगडे, योगेश मगरे, मझर शेख, गोलू शेख, कृष्णा माळी, साहिल माळी आणि मनोज गोसावी यांनी परिश्रम घेतले. अन्नदानासोबतच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला.


Protected Content

Play sound