


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘फिजिओ गणेशा २०२६’ या गणेशोत्सवाची भावूक वातावरणात सांगता झाली. महाविद्यालयात गणरायाची मनोभावे पूजा व आरती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात उत्साहपूर्ण विसर्जन मिरवणूक काढली. त्यानंतर मेहरूण तलाव येथे भक्तिमय वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात महाविद्यालय परिसरात विविध उपक्रमांमधून भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. विसर्जनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी बाप्पाची मनोभावे पूजा करून आरती केली. आरतीनंतर ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘एक-दोन-तीन-चार, गणपतीचा जयजयकार’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी नृत्य करत गणरायाच्या आगमनाचा आणि निरोपाचा उत्साह व्यक्त केला. भक्ती, उत्साह आणि जल्लोषाने भारलेल्या वातावरणात महाविद्यालयातून गणरायाला मेहरूण तलावाच्या दिशेने नेण्यात आले. मात्र विसर्जनाची वेळ जवळ येताच आनंदाच्या वातावरणाला भावूकतेची किनार लाभली. अनेक विद्यार्थ्यांना बाप्पाला निरोप देताना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. लाडक्या गणरायाला जड अंतःकरणाने, भरलेल्या डोळ्यांनी आणि उत्सवाच्या असंख्य आठवणींसह निरोप देण्यात आला.
मेहरूण तलाव येथे भक्तिमय वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांसाठी हा क्षण आनंदासोबतच भावनिक ठरला. संपूर्ण विसर्जन सोहळा महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेने प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर आणि प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे पार पाडला. विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयीन प्रशासनाच्या सहभागामुळे ‘फिजिओ गणेशा २०२६’चा उत्सव भक्ती आणि उत्साहात पार पडला.



