


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संताजी नगर येथील श्री संत गजानन गणेश मंडळात माळी समाजसेवक तथा युवा उद्योजक गोकुळ रमेश माळी यांच्या हस्ते गणरायाची आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माळी समाजातील युवा उद्योजक म्हणून गोकुळ रमेश माळी यांची ओळख असून, समाजातील विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने सक्रिय सहभाग घेत असतात. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य ते करीत आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत श्री संत गजानन गणेश मंडळ, संताजी नगर येथे त्यांना गणरायाच्या आरतीचा मान देण्यात आला. आरतीच्या वेळी गोकुळ रमेश माळी यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून आरती केली. यावेळी त्यांनी सर्व समाजातील नागरिकांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना केली. तसेच शेतकरी बांधवांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदावे, अशी मनःपूर्वक भावना त्यांनी व्यक्त केली.
गणरायाच्या आरतीदरम्यान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी गणरायाचा जयघोष करत उत्साहात आरतीत सहभाग घेतला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये भक्तीभावासोबतच सामाजिक एकोपा आणि बांधिलकीची भावना दृढ होत असल्याचे यावेळी दिसून आले. श्री संत गजानन गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना गणरायाच्या आरतीचा मान देण्याची परंपरा जपली जात आहे. त्याच अनुषंगाने गोकुळ रमेश माळी यांना मिळालेला आरतीचा मान हा त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेणारा ठरला.



