Home Cities जळगाव नशिराबादमध्ये भाजपच्या वतीने पाच दिवसीय महिला योग शिबिरास प्रारंभ ; महिलांचा उत्स्फूर्त...

नशिराबादमध्ये भाजपच्या वतीने पाच दिवसीय महिला योग शिबिरास प्रारंभ ; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

0
13


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी नशिराबाद शहराच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पाच दिवसीय महिला योग शिबिरास सुरुवात झाली. परमार्थ सेवा केंद्र येथे आयोजित या शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योग आणि निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन घेतले.

भारतीय जनता पार्टी नशिराबाद शहराच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून भाजप मंडलाच्या वतीने महिलांसाठी विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमध्ये योगाभ्यासाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या शिबिराचा उद्देश आहे. शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील, नगरसेविका जनाबाई रंधे, सुवर्णा महाजन आणि नगरसेवक प्रदीप बोढरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. योग प्रशिक्षक दीपाली कोल्हे यांनी ‘योग एक दिवस, संस्कार एक, निरोगी भविष्य’ या संकल्पनेतून योगाचे महत्त्व उपस्थित महिलांना समजावून सांगितले. नियमित योगासनांच्या सरावामुळे शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होते, तर श्वसनाचे व्यायाम आणि प्राणायामामुळे शरीर व मनाला लाभ होऊ शकतो, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

मान, खांदे आणि पाठीवरील ताण कमी करण्यासाठी योग्य योगासनांचा सराव कसा करावा, मनःशांतीसाठी योगाचा उपयोग कसा करता येतो, दैनंदिन जीवनात योगाभ्यासाचा योग्य वापर कसा करावा, तसेच शरीराकडून मिळणारे संकेत ओळखण्याची सवय कशी लावावी, याबाबतही शिबिरात माहिती देण्यात आली. महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांमध्येही योग्य पद्धतीने केला जाणारा योगाभ्यास उपयुक्त ठरू शकतो, असे योग प्रशिक्षक दीपाली कोल्हे यांनी सांगितले. योगासनांसोबत श्वसन व प्राणायामाचा नियमित सराव करण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.

शिबिराच्या प्रारंभीच महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याने आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुढील पाच दिवस विविध योगासनांचा सराव आणि योगाशी संबंधित मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिलांनी या पाच दिवसीय योग शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारावी आणि शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound