Home Cities पारोळा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पारोळ्याचे नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय! सात महिन्यांचे मानधन...

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पारोळ्याचे नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय! सात महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द

0
1

पारोळा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक संकटाचा सामना करत असताना पारोळा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षपदाच्या मागील सात महिन्यांचे संपूर्ण एक लाख रुपये मानधन त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला. मुंबई येथे आयोजित नगराध्यक्षांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

लोकप्रिय आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला. लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारे मानधन हे जनतेच्या सेवेसाठीच उपयोगी पडावे, या भावनेतून त्यांनी स्वतःच्या सात महिन्यांच्या मानधनाचा त्याग करून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे ठरविले. केवळ पदाची जबाबदारी पार पाडण्यापुरते मर्यादित न राहता संकटाच्या काळात गरजू नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी या कृतीतून स्पष्ट केली आहे. आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला लोकप्रिय आमदार ॲड. अमोल पाटील उपस्थित होते. याच बैठकीदरम्यान नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला. राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी आणि संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळावा, या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला.

राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. पावसाच्या अनिश्चिततेचा आणि पाणीटंचाईचा परिणाम शेतकऱ्यांसह शेतमजूर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना मदतीची गरज आहे. शासनाच्या मदतीसोबतच लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. याच सामाजिक जाणिवेतून चंद्रकांत पाटील यांनी आपले सात महिन्यांचे संपूर्ण मानधन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधी म्हणून मिळणाऱ्या मानधनाचा उपयोग वैयक्तिक फायद्यापेक्षा समाजहितासाठीही करता येऊ शकतो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. जनतेने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून संकटाच्या काळात समाजासाठी योगदान देण्याची त्यांची भूमिका इतर लोकप्रतिनिधींसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.

आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा शहराच्या विकासासोबतच सामाजिक प्रश्नांवरही संवेदनशीलतेने काम केले जात असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. शहराच्या विकासासाठी प्रयत्न करतानाच ग्रामीण भागातील शेतकरी आणि दुष्काळग्रस्त नागरिकांच्या अडचणींची जाणीव ठेवून मदतीचा हात पुढे करणे, ही लोकप्रतिनिधींच्या सामाजिक उत्तरदायित्वाची महत्त्वाची बाजू असल्याचे या निर्णयातून दिसून येते. या बैठकीप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे उपनेते संजय निरुपम, आमदार संजय गायकवाड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह शिवसेनेचे विविध नेते, पदाधिकारी, राज्यातील नगराध्यक्ष आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound