यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणाऱ्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वढोदा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावल तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा वढोदा ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
वढोदा येथे सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या परिसरासह गावातील विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासोबतच लावण्यात आलेल्या झाडांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन उपस्थितांकडून करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन करणे हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक झाड लावून त्याची नियमित काळजी घ्यावी, हा ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमामागील प्रमुख संदेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर आणि उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये वृक्षलागवड केल्यामुळे वढोदा गावात पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचला. वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणपूरक उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर (आप्पा) सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, रोजगार सेवक, ग्रामस्थ तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षारोपण उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची अपेक्षा व्यक्त केली.



