यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल येथे आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने भव्य सांस्कृतिक रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि सामाजिक एकजुटीचे दर्शन घडणार आहे. रॅलीमध्ये जिल्ह्यातील टोकरे कोळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावल शहरातील फैजपूर रोडलगत असलेल्या मनुदेवी मंदिरापासून सकाळी ९.३० वाजता भव्य सांस्कृतिक रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅलीचा समारोप यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात होणार आहे. या रॅलीदरम्यान आदिवासी समाजाच्या पारंपरिक वेशभूषा, संस्कृती, कला, प्रथा-परंपरा आणि विविध सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन सहभागी नागरिकांना घडणार आहे. जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. शांताराम दादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे आणि माजी जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या हस्ते सांस्कृतिक रॅलीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष साळुंखे, माजी सरपंच यशवंत सपकाळे, भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष हरलाल कोळी, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास तायडे, जितेंद्र सपकाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष सागर कोळी, बबलू कोळी, नितीन सपकाळे, नगरसेविका सौ. सविता नन्नवरे आणि माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक रॅलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आदिवासी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासोबतच समाजातील युवकांना आपल्या संस्कृतीशी जोडणे, सामाजिक एकोपा मजबूत करणे आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मनुदेवी मंदिरापासून सुरू होणारी रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पोहोचणार आहे. या रॅलीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम आणि पारंपरिक कलांचे सादरीकरण होणार असल्याने नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप कोळी, उपाध्यक्ष निकिता कोळी, दीपक कोळी, मुकेश कोळी, खजिनदार खेमचंद कोळी तसेच समितीतील सदस्य परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



