मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथे राज्य परिवहन महामंडळाच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून शिक्षण व्यवस्थेवरच याचा गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गावात बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा आणि त्रासदायक प्रवास सहन करावा लागत आहे.
गावातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सकाळी लवकर रस्त्यावर उभे राहून एस.टी. बसची वाट पाहावी लागते. मात्र, अनेक वेळा बस थांबतच नसल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास उन्हात, पावसात उभे राहण्याची वेळ येते. यामुळे त्यांच्या शाळेत पोहोचण्यास उशीर होतो, तर काही वेळा पूर्ण दिवसाचा शैक्षणिक तोटा सहन करावा लागतो. ही परिस्थिती केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर महिलां आणि वृद्धांसाठीही अत्यंत त्रासदायक ठरत आहे.

या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “एस.टी. महामंडळ झोपलंय का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. ग्रामीण भागातील मूलभूत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असताना संबंधित यंत्रणा गप्प का आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. गावात बस थांबवण्यासाठी अजून किती हाल सहन करावे लागणार, असा संतप्त सूर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन बससेवा नियमित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जर लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करण्यात आली नाही, तर स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



