Home क्राईम चांगदेव येथे आयशरची ट्रान्सफॉर्मरला जोरदार धडक ; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? ग्रामपंचायतीच्या पत्रामुळे...

चांगदेव येथे आयशरची ट्रान्सफॉर्मरला जोरदार धडक ; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? ग्रामपंचायतीच्या पत्रामुळे नवा वाद 

0
9

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे अवजड आयशर वाहनाने महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरला जोरदार धडक दिल्याने ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले आणि परिसरातील वीजपुरवठा काही काळ विस्कळीत झाला. या गंभीर घटनेनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली का, तसेच संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला का, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, चांगदेव ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवरून महावितरणला देण्यात आल्याचा दावा असलेल्या पत्रामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MH-19 CT-9946 क्रमांकाच्या आयशर वाहनाने महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला जोरदार धडक दिल्याने ट्रान्सफॉर्मरची संरचना मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली. या अपघातामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचा वीजपुरवठा काही काळ खंडित झाला. घटनेनंतर महावितरणचे कंत्राटी कर्मचारी आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. मात्र, या अपघाताची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलिस प्रशासनाला देण्यात आली होती का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महावितरणच्या नियमांनुसार अशा प्रकारच्या घटनेनंतर पोलिस तक्रार, पंचनामा, नुकसानीचे मूल्यांकन, संबंधित वाहनाविरुद्ध नुकसानभरपाईची प्रक्रिया आणि जबाबदारी निश्चित करणे अपेक्षित असते. मात्र, या प्रक्रियेचे पालन झाले की नाही, याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसल्याने शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, परिसरात संबंधित वाहनमालकाशी आर्थिक तडजोड करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू आहे. तसेच ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती तातडीने करण्यात आल्याचाही दावा केला जात आहे. या दाव्यांची स्वतंत्र किंवा अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, या चर्चांमुळे संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

या घटनेचा पाठपुरावा लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने केल्यानंतर महावितरण प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांमध्ये हालचाली वाढल्याची चर्चा आहे. त्यानंतर एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून चांगदेव ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवरून महावितरणला पत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रात, आयशर वाहनामुळे नुकसान झालेल्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती आणि देखभाल संबंधित वाहनमालकाकडून करून घेण्यात येणार असून महावितरणने त्यामध्ये हस्तक्षेप करू नये, असा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. महावितरणचे उपविभागीय अभियंता शुक्ला यांनीही अशा स्वरूपाचे पत्र ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाल्याची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

या घडामोडींमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महावितरणच्या मालमत्तेच्या नुकसानीच्या प्रकरणात ग्रामपंचायतीला अशा प्रकारचे पत्र देण्याचा अधिकार आहे का? हे पत्र कोणाच्या सूचनेवरून देण्यात आले? सरकारी नुकसानभरपाईच्या प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थेचा हस्तक्षेप का झाला? तसेच ग्रामपंचायतीवर कोणत्याही प्रकारचा दबाव होता का, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे.या संदर्भात मुक्ताईनगरचे कार्यकारी अभियंता शिवाजीराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, “मला याबाबत कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचवेळी संबंधित ठेकेदार त्यांच्या दालनात उपस्थित असल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रशासकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

उपअभियंता शुक्ला यांनीही, “मला याबाबत माहिती नाही. तुमच्याकडे फोटो किंवा व्हिडिओ असतील तर पाठवा, मी संबंधित ठेकेदाराला विचारतो,” असे उत्तर दिल्याचा दावा करण्यात आला आहे. अपघाताला आठवडाभराहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही जबाबदार अधिकाऱ्यांकडे स्पष्ट माहिती नसल्याचे सांगितले जात असल्याने प्रशासकीय समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी ट्रान्सफॉर्मरजवळ शेतकरी किंवा शेतमजूर उपस्थित असते, तर मोठी जीवितहानी होऊ शकली असती. त्यामुळे अशा गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

यापूर्वीही चांगदेव परिसरात आवश्यक परवानग्या न घेता वीजवाहिन्यांच्या स्थलांतराची कामे झाल्याचे आरोप झाले होते. तसेच मुक्ताईनगर शहरातील गजानन महाराज परिसरात विद्युत खांबावर काम करताना एका मजुराला विजेचा धक्का बसून तो खाली पडल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातही संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्यात आल्याची चर्चा होती. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून अपघातानंतर पोलिसांना माहिती का देण्यात आली नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांना विलंबाने माहिती का मिळाली, पंचनामा व नुकसानभरपाईची प्रक्रिया झाली का, दुरुस्तीचा खर्च कोणी केला, ग्रामपंचायतीचे पत्र कोणाच्या सूचनेवरून देण्यात आले आणि संबंधित अधिकारी किंवा ठेकेदारांची जबाबदारी निश्चित होते का, याचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound