चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ आज भडगावात कडकडीत बंद

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या भयंकर घटनेचा निषेध करण्यासाठी आज भडगाव शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील नऊ वर्षाच्या बालीकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडल्याने परिसर हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असली तरी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून त्याला कठोर शिक्षा व्हावी, तसेच या प्रकरणात उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी अशा मागण्या करण्यात येत आहेत.

 

या मागण्यांसाठी काल शुक्रवारी भडगावात भव्य मूक मोर्चासह ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात सकल मराठा समाजासह अन्य समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाच्या दरम्यान आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पिडीत कुटुंबियांना कठोर कारवाईबाबत आश्‍वस्त केले. तर, विविध मान्यवरांनी कठोर कारवाईची मागणी केली.

 

दरम्यान, या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज भडगाव येथे स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सकाळपासूनच सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत. नागरिकांनी या बंदला पाठींबा देऊन या प्रकरणाचा निषेध केला आहे. तर, याच प्रकारे भडगाव तालुक्यातील नगरदेवळा आणि कजगाव येथे देखील आज बंद पाळण्यात येत असल्याचे समजते.

Protected Content