गौणखनिज मुरुमसाठा अवैध ठरवून कजगाव रेल्वे उड्डाणपूल ठेकेदारास दंडाची नोटीस

भडगाव प्रतिनिधी । भडगाव तहशिलदार यांनी अनाधिकृत गौणखनिज मुरुम साठा अवैध ठरवून कजगाव – तरवाडे पारोळा रस्त्यादरम्यान कजगाव येथील रेल्वे उड्डाणपूल ठेकेदारास सुमारे ८ लाख रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.

 

कजगाव उड्डाणपुलाच्या कामाची पहाणी करताना राज्यस्तरीय दक्षता पथक यांनी गौण खनिज वापर व गौणखनिज रक्कम भरणा याबाबत पडताळणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ठेकेदार बी. आर. भदाणे यांना तीन दिवसापूर्वी अवैध मुरुम साठा दंड नोटीस बजावण्यात आली आहे.

कजगाव- तरवाडे पारोळा रस्ता दरम्यान कजगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सन पासून सुरु असून या कामाची मुदत लवकरच संपत आहे. सदरचे काम ठेकेदार धुळे येथील बी. आर भदाणे हे करीत आहे. दिनांक १२ आगस्ट २०२१ रोजी राज्यस्तरीय दक्षता पथक यांनी प्रत्यक्ष कामावर भेट देऊन पहाणी केली होती. उड्डाणपुलाचे कामाची पहाणी करत असताना गौणखनिज वापर व गौणखनिज रक्कम भरणा याची प्रत्यक्ष पडताळणी करण्याबाबत भडगाव तहशिलदार याना सुचित केले होते.

याबाबत सार्वजनिक बांधकाम अभियंता अक्षय सांवत, मंडळ अधिकारी आर. पी. शेजवळकर, कजगाव तलाठी उमेश पाटील यांच्या पथकाने सप्टेबर २०२१ मध्ये कजगाव येथील रेल्वे उड्डाणपूल बांधकामवर भेट देऊन उड्डाणपुल साठी वापरण्यात आलेले गौणखनिज व केलेला गौणखनिज साठा यांची मोजणी करुन किती ब्रास गौण खनिज वापर केला आहे. याबाबत मोजणी करुन अहवाल भडगाव तहशिल कार्यालयास सादर केला.

या कामावर १८२०८ ब्रास गौणखनिज वापर करण्यात आला आहे. तर ६८ ब्रास मुरुम साठा अवैध असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. अवैध ठरविलेल्या मुरुम साठा महाराष्ट्र जमिन महसुल संहिता १९६६ चे कलम ४८ पोट कलम ७ व ८ (१), (२) मधिल तरतुदी तसेच महाराष्ट्र जमिन महसुल नियम २०१७ चे नियम ९ पोटनियम (१), (२) मधिल तरतुदीनुसार एकत्रीत रक्कम आकरणी करत रक्कम ८ लाख १४ हजार ६४०/- दंडास पात्र आहे. सदरचा दंड आपणास का करण्यात येवू नये ? याबाबत ७ दिवसाच्या आंत खुलासा सादर करण्याबाबत सुचित केले आहे. खुलासा सादर न केल्यास नोटीस मान्य असे गृहीत धरुन रक्कम वसुलीची कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Protected Content