गुन्हेगारीकरणाच्या विरोधात डिसेंबरमध्ये राज्यव्यापी निदर्शने : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | राजकारणातील गुन्हेगारीकरणाच्या विरोधात डिसेंबरमध्ये राज्यभर उग्र निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

 

चंद्रकांत पाटील आज पत्रकार परिषदेत म्हणाले की, राज्यातील महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, अंमलीपदार्थांचे समर्थन, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी भाजप राज्यभर २० हजार छोट्या सभांचे आयोजन करण्यात येईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये मोठं आंदोलन करू, अस पाटील यांनी सांगितलं.

 

चंद्रकांत पाटील यांनी आज एसटी कामगारांच्या संपावरूनही सरकारवर ताशेरे ओढले. सरकारने या कामगारांना केवळ अडीच हजार रुपये बोनस दिला. आपण घरातल्या कामवाल्या ताईलाही पाच हजार रुपये देतो. आम्ही कोविड असताना काम केलं. पण पगार झाला नाही, असं एसटी कामगार सांगत आहेत. एसटी कर्मचार्‍यांचा संप भयावह झाला आहे. कोर्टाने आवाहन करूनही त्यात फरक पडला नाही. सरकारने संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळावं असं कोर्टालाही वाटतं. हे भाजपचं आंदोलन वाटू नये म्हणून आम्ही या आंदोलनाचं नेतृत्व करत नाही. आम्ही त्यांना पाठबळ दिलं आहे. हे कामगारांचंचं आंदोलन राहिलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या काळात एकही दंगल झाली नाही. मुस्लिमांवर अन्याय होत होता असं नाही. त्यांनाही सन्मानाने वागवलं जात होतं. यामुळे राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे. बोटचेपी भूमिका घेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.

Protected Content