Home Cities जळगाव रस्त्यावर प्रसूती प्रकरण: जिल्हाधिकारी व सीईओंची घटनास्थळी भेट, चौकशी समिती नियुक्त

रस्त्यावर प्रसूती प्रकरण: जिल्हाधिकारी व सीईओंची घटनास्थळी भेट, चौकशी समिती नियुक्त


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमढी येथे एका आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्याची गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी आज (बुधवार, २८ मे २०२५) स्वतः घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली.

प्राथमिक माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करेल आणि त्यानंतर संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रकरणात झालेल्या दुर्लक्षाची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही घटना वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कर्जाने उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात घडली होती. संबंधित महिला पतीसह दुचाकीवरून उपकेंद्रात येत असताना वाटेतच प्रसववेदना सुरू झाल्याने रस्त्यातच बाळाचा जन्म झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने त्वरीत हालचाल करून आरोग्य पथकासह संबंधित भागात भेट दिली. सध्या आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली असून, बाळ जन्मतः २८०० ग्रॅम वजनाचे होते.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, कर्जाने उपकेंद्रासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेवर आलेल्या प्रश्नांची गंभीर दखल प्रशासनाने घेतल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound