जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते पहूर रस्त्यावर असलेल्या रॉयल फर्निचर दुकानासमोरून पायी जात असलेल्या एका मजूराला भरधाव ट्रकने धडक दिली. या धडकेत मजूराच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना २२ मे रोजी घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती अखेर मंगळवारी २७ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय सुधाकर सोनार वय ५४ रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे २२ मे रोजी सकाळी १०.३० वाजता जळगाव ते पहूर रस्त्यावरून जात असतांना समोरून येणारा ट्रक क्रमांक (एमएच ४१ एयू ५०८३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत विजय सोनार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना जखमीवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी विजय सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी २७ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.