Home Cities जळगाव जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

0
423


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कौटुंबिक कलह हा फक्त पती-पत्नीतील वादापुरता मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आणि सामाजिक ताणतणावाशीही निगडित आहे, या व्यापक संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन जळगावातील ओंकारनगर येथे उत्साहात पार पडले.

दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता छोटेखानी पण सुबक आयोजनात महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघच्या खान्देश शाखेच्या “कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्र”ाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला समाजातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाला महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार, समुपदेशन समितीचे प्रमुख, माजी नगराध्यक्ष  बंडू काळे, महासंघाचे अध्यक्ष  अरुण बोरोले, खान्देश महिला उपाध्यक्षा सौ नीता वराडे, कोशाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळ, जळगावचे अध्यक्ष  लिलाधर चौधरी, डॉ. ॲड. सौ. ज्योती भोळे आदी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना अरुण बोरोले यांनी समुपदेशन समितीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, कौटुंबिक कलह केवळ वैवाहिक नात्यांपुरता मर्यादित नसून शिक्षणातील अडचणी, आरोग्याच्या समस्या, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या अडचणींसारख्या विविध सामाजिक प्रश्नांवरही हे केंद्र मार्गदर्शन करणार आहे.

कार्यक्रमात एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला. उपस्थित समाजबांधवांमधून काही नावे निवडून लकी ड्रॉ काढण्यात आला आणि त्यातून विजयी ठरलेल्या शांताराम फेगडे यांच्या हस्ते समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या अनोख्या पद्धतीचे सर्वत्र कौतुक झाले.

यावेळी  बंडू काळे यांनी समुपदेशन समितीचे काम काटेकोरपणे आणि निःपक्षपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवून प्रत्येक प्रकरण हाताळले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती कमलाकर रोटे यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

या समारंभाला लेवा पाटीदार समाजातील पदाधिकारी, सदस्य तसेच समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मिलिंद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती साधना लोखंडे यांनी सादर केलेल्या पसायदानाने वातावरण भारावून गेले.


Protected Content

Play sound