Home Cities जळगाव प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई : जिल्हाध्यक्ष...

प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई : जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील नगरसेविका अजमाबानो इरफान कुरेशी यांच्या अपात्रता सुनावणीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, काँग्रेस पक्षाच्या नावाने बनावट पत्र सादर करून सुनावणी प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

भुसावळ येथील नगरसेविका अजमाबानो इरफान कुरेशी यांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू असताना,भुसावळ येथील काँग्रेस कार्यकर्ते मुनावर खान यांनी कथितरीत्या नगरसेविकांच्या अर्ज प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे, प्रदेश काँग्रेसच्या नावाने बनावट रबरी शिक्के तयार करून त्यावर स्वाक्षरी करून नगरसेविकांच्या पात्रतेचा अर्ज रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ही बाब उघडकीस आल्यानंतर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीने तात्काळ दखल घेतली. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारचे कोणतेही अधिकृत पत्र प्रदेश काँग्रेसकडून जारी करण्यात आलेले नाही. संबंधित अर्जासोबत जोडलेले दिनांक 13 एप्रिल 2026 चे पत्र पूर्णतः बनावट असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, मुनावर खान यांनी स्वतःला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष असल्याचे भासवले असले तरी ते पक्षाचे अधिकृत पदाधिकारी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रदीप पवार यांनी पुढे सांगितले की, संबंधित प्रकरण अत्यंत गंभीर असून काँग्रेस पक्षाच्या नावाचा गैरवापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. संबंधित नगरसेविकेने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे आधीच अपात्रतेची सुनावणी सुरू असताना, या प्रक्रियेत खोट्या कागदपत्रांच्या माध्यमातून अडथळा आणण्याचा प्रयत्न हा गंभीर गुन्हा मानला जाईल.

जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसांकडूनही संबंधित व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. पक्ष शिस्तभंगाच्या आधारे त्यांना तत्काळ पक्षातून निष्कासित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, त्यांच्या ताब्यातील सर्व पदे काढून घेण्याचा निर्णयही घेण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.


Protected Content

Play sound