रावेर तालुक्याला वादळाचा तडाखा : केळीची मोठी हानी


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह तालुक्याला रविवारी सायंकाळी वादळाचा मोठा फटका बसला असून यामुळे ३१ गावांतील ६८६ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे सुमारे ३४२ हेक्टरवरील केळीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

वादळामुळे थेरोळा, गौरखेड, कुसूबा, आहेरवाडी, निंबोल, खिरवड, चिनावल, कळमोदा, सावखेडा, खिरोदा, खानापूर आदी गावांतील शेतकऱ्यांचे केळी पीक आडवे गेले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतांतील केळीचे झाडे आडवे पडले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. आधीच शेतकरी जेरीस आलेला असतांना वादळ्याच्या तडाख्यामुळे शेतकरी वर्गात नैराश्याचे वातावरण पसरले आहे.

या नुकसानीबाबत तहसीलदार बंडू कापसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “सायंकाळी झालेल्या वादळामुळे तालुक्यातील केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. मी स्वतः या परिस्थितीचा आढावा घेत असून, संबंधित गावांमध्ये तलाठी व कृषी विभागाच्या पथकांना लागलीच पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”

प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार नुकसानीचा आढावा सुरू असून, लवकरच शासकीय मदतीसाठी अहवाल पाठवण्यात येणार आहे. वादळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा आहे.