जळगाव वनविभाग अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हयातील अनेक वृत्तपत्रांमध्ये २० जानेवारी रोजी उप वनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगांव यांचे विरुध्द प्रसिध्द करण्यात आलेली बातमी ही खोटी व आकसबुध्दीने देण्यात आलेली असून भारतीय वन सेवेतील प्रतिष्ठीत अधिकारी यांची नाहक बदनामी करण्याचे दृष्टीने देण्यात आलेली आहे. यावल वनविभाग, जळगांव या विभागातील रमेश अरुण भुतेकर, सध्या निलंबित वनरक्षक आहे.

या विभागात वनरक्षक जिन्सी, वनपरिक्षेत्र रावेर पदी कार्यरत असतांना त्यांनी त्यांचे शासकीय कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने रमेश अरुण भुतेकर यांना शासकीय कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याबददल दिनांक १२.०९.२०२४ रोजी निलंबित केल्याने त्यांचेवरील निलंबन मागे घेणेकामी भुतेकर, निलंबीत वनरक्षक हे त्यांचे पत्नी मनिषा रमेश भुतेकर यांचेसह या विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात आकसबुध्दीने / हेतुपुरस्सर खोट्या तक्रारी, गुन्हे नोंदवून या विभागाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

रमेश भुतेकर, निलंबीत वनरक्षक यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव जामन्या हे असतांना भुतेकर निलंबीत वनरक्षक हे विनापरवाना मुख्यालय सोडून वारंवार विभागीय कार्यालयातील व वनपरिक्षेत्र अधिकारी, रावेर यांचे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे विरुध्द खोटया तक्रारी, खोटे अर्ज करीत असतात. या बाबत पोलीस अधिक्षक, जळगांव यांना या विभागामार्फत कळविण्यांत आले आहे. तसेच रमेश अरुण भुतेकर, निलंबीत वनरक्षक यांनी उप वनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगांव यांचेशी दिनांक २२.११.२०२४ रोजी केलेल्या गैरवर्तणूकीबाबत यापूर्वीच रामानंदनगर पोलिस स्टेशन, जळगाव येथे दिनांक २३.११.२०२४ रोजी NCR N० १०२९/२०२४ दि.२३.११.२०२४ अन्वये श्री. भुतेकर, निलंबीत वनरक्षक यांचे विरुध्द या विभागाकडून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

रामानंदनगर पोलीस स्टेशन, जळगांव येथील पोलीस निरीक्षक यांनी दि.१८.०१.२०२५ रोजी दुपारी २ वाजता श्री. रमेश अरुण भुतेकर, वनरक्षक यांचे फिर्यादीवरून कोणतीही शहानिशा तसेच वरीष्ठांशी चौकशी चर्चा देखील न करता रमेश अरुण भुतेकर, निलंबीत वनरक्षक यांचे सांगणेवरुन व दबावात येवून अखिल भारतीय वन सेवेतील दर्जाचे वन अधिकारी यांचेवर अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.

सदरची बाब ही अत्यंत लाजिरवाणी व खेदजनक असून अशाप्रकारे कोणाचेही तक्रारीवरुन शहानिशा न करता पोलिस निरीक्षक हे अधिकारी / कर्मचारी यांचेवर असे गुन्हे नोंद करत असतील तर प्रशासन चालवणे कठीण होईल, याची गांर्भियाने दखल घेण्यात येवून उचित कारवाई होण्याबाबत . जिल्हाधिकारी, जळगांव यांना दि.२१.०१.२०२५ रोजी जळगांव जिल्हयातील वनविभागाचे वन अधिकारी कर्मचारी यांनी निवेदन देवून संबंधीतांवर उचित कारवाई करण्याची मागणी केली. सदर निवेदन देणेकामी संचालक, दादासाहेब चौधरी वनप्रशिक्षण संस्था, पाल हेमंत शेवाळे, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाड़गे, समाधान पाटील, उमेश बिराजदार, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, सुनिल भिलावे, भाईदास थोरात, प्रशांत साबळे, गोपाल बडगुजर, स्वप्निल फटांगरे तसेच क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content