यावल कृषी कार्यालयात ७० लाखांचा अपहार

यावल प्रतिनिधी । येथील कृषी कार्यालयात तब्बल ७० लाखांचा अपहार उघडकीस आला असून या प्रकरणी सात वर्षांनी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, यावल तालुका कृषी कार्यालयात सहाय्यक अधिक्षक या पदावर कार्यरत असतांना नामदेव मंगा वाडे यांनी अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. वाडे यांनी ६९ लाख ३३ हजार ३६० रूपयांच्या धनादेशावर तत्कालीन कृषी अधिकार्‍यांची स्वाक्षरी घेऊन हे धनादेश स्वत: वटवून टाकल्याची माहिती यातून समोर आली आहे. हा प्रकार २००६ ते २०१३ या कालखंडात घडला.

अलीकडच्या काळात चौकशीतून ही बाब समोर आल्यानंतर कृषी खात्याचे उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्‍वर राजाराम बोर्‍हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्थानकात नामदेव मंगा वाडे यांच्या विरोधात भादंवि कलम ४६७, ४६८, ४७१, ४०९, ४२० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तब्बल सात वर्षांनी इतक्या मोठ्या रकमेच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Protected Content