यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय बहूउद्देशीय पत्रकार संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने फत्तेपुर, ता. जामनेर येथे राज्यस्तरीय ‘समभाव पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३० मान्यवरांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा, राजकारण, प्रशासकीय सेवा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याने या सोहळ्याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
हा राज्यस्तरीय सन्मान सोहळा दिनांक १५ जून रोजी सकाळी १० वाजता फत्तेपुर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराद्वारे प्रोत्साहन देण्याचा उद्देश संघटनेचा असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असून, मोठ्या संख्येने पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या नियोजनासाठी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कार्यक्रमाच्या तयारीसह पत्रकारांशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकार संघटनेच्या बळकटीकरणासह सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांच्या प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीस पत्रकार संघाचे राज्य प्रभारी अय्युब पटेल, सचिव जीवन चौधरी, कार्याध्यक्ष विजय जोशी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण क्षेत्राचे प्रदेशाध्यक्ष विजय बन्सोड, विभागीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अलीम चाऊस, विजय कुलकर्णी, मुन्ना शेख, विजय काळे, श्याम मोराणकर, गणेश जाधव, सलीम पटेल, मराठवाडा क्षेत्र प्रमुख मोहम्मद अबूबकर, राजेश कुलकर्णी, शेखर खाटीक, फिरोज शाह, राजेंद्र मराठे, सुनील पिंजारी, बाळासाहेब आढाळे, सुभाष कोळी, रवि कोलते, अनिल न्याहळदे, रमेश बेलसरे, हर्षल आंबेकर, फिरोज तडवी, एजाज पठाण, रणजीत भालेराव, प्रदीप सिसोदिया, रावण ठाकरे आदी पत्रकार व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



