जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील डॉ. गुणवंतराव आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘आरोहण २०२६’ ला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. ‘कुरुक्षेत्र’ या उद्घाटनपर क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या ऊर्जा, एकता आणि खिलाडूवृत्तीचा संगम अनुभवायला मिळाल्याने संपूर्ण महाविद्यालय परिसर आनंद आणि उत्साहाने भारून गेला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख उपस्थितीत असलेल्या डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते औपचारिकरित्या मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. तसेच ‘आरोहण २०२६’ च्या प्रतीकात्मक फलकाचे अनावरण करून महोत्सवाच्या प्रारंभाची घोषणा करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, प्राध्यापकवर्ग, अध्यापन कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कुरुक्षेत्र’ अंतर्गत पुढील तीन दिवस विविध सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धांदरम्यान मैदानावर जिद्द, मैत्रीभाव आणि निकोप स्पर्धेचे वातावरण पाहायला मिळाले. प्रत्येक संघ आणि खेळाडूने आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली.
महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक व्यायामास चालना मिळतेच, शिवाय विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि एकोप्याची भावना निर्माण होते, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. प्रत्येक स्पर्धा ही जिंकणे-हरणे यापलीकडे जाऊन खिलाडूवृत्तीने स्वीकारावी, असा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.
आरोहण २०२६ महोत्सवाचे आयोजन ८ ते १२ मे दरम्यान करण्यात आले असून विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ८ ते १० मे दरम्यान क्रीडा स्पर्धा पार पडणार असून ११ मे रोजी ‘प्रॉम नाईट’ तर १२ मे रोजी ‘डीजे नाईट’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाचा समारोप होणार आहे.



