कोलकाता-वृत्तसेवा । पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवत भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला असून आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी यांची निवड निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आज सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यापैकी अभिनेत्री व भाजप नेत्या रूपा गांगुली यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दुसरे उपमुख्यमंत्री दार्जिलिंग परिसरातील एका पुरुष आमदाराला करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी देखील राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
नव्या सरकारचा शपथविधी ९ मे रोजी कोलकाता येथील प्रसिद्ध ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’वर भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह एनडीएतील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याने हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावरील शक्तिप्रदर्शन मानला जात आहे.
या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भवानीपूर मतदारसंघातून पराभूत करत मोठा राजकीय धक्का दिला. तसेच त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत आपला प्रभाव कायम राखला आहे. विशेष म्हणजे, २०२१ मध्येही त्यांनी नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यामुळे सुवेंदू अधिकारी हे भाजपच्या पश्चिम बंगालमधील सर्वात प्रभावी चेहरा म्हणून उदयास आले आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल २०७ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तृणमूल काँग्रेसच्या दीर्घकालीन सत्तेला मोठा धक्का बसला असून राज्यात पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. या विजयामुळे राष्ट्रीय राजकारणातही भाजपची ताकद अधिक वाढल्याचे मानले जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडवून भाजपने इतिहास रचला असून सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होणार असल्याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.