जळगाव प्रतिनिधी । कापसाच्या नवीन वाणांची माहिती, कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण व इतर घटकांबाबत जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीजास्त माहिती व्हावी, याकरीता जागतिक कापूस दिनाचे औचित्य साधून कृषि विभागातर्फे जिल्ह्यात 7 ऑक्टोबर, 2021 रोजी एकदिवशीय राज्यस्तरीय कापसू परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात कृषी विभागातर्फे या एक दिवसीय राज्यस्तरीय कापूस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कापूस पिकासाठीचे तंत्रज्ञान, उत्पन्नवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांसह इतर विषयांवर तज्ञांची चर्चासत्रे व नाविन्यपूर्ण बाबींचे कृषी प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय कापूस परिषदेच्या नियोजनाच्या अनुषंगाने नुकतीच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस कृषी संचालक(विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संशोधन संचालक शरद गडाख, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी, कापुस पैदासकार संजीव पाटील, वरिष्ठ कृषि विद्या शास्त्रज्ञ बी.डी. जडे, मोहिम अधिकारी पी. एस. महाजन, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ, महाबीज, जिनिंग प्रेसिंगचे प्रतिनिधी, खाजगी बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.
या परिषदेला कृषी मंत्री दादाजी भुसे, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, पालकमंत्री गुलाबराव पाटील कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी सचिव, कृषी आयुक्त, राहुरी परभणी व अकोला कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, कृषी निविष्ठा कंपनीचे प्रतिनिधी तसेच औरंगाबाद, बुलडाणा, जालना, अकोला, नंदूरबार व धुळे या जिल्ह्यातून निवडक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे कृषी विभागाच्या यूट्यूब चैनलद्वारे प्रसारण करण्यात येणार आहे.
कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन या परिषदेच्यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांकडून प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी यावेळी दिल्यात.