Breaking : आता ३ मे पर्यंत लॉकडाऊन – पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील जनतेने कोरोना विरूध्दचा लढा चांगल्या प्रकारे दिल्याचे नमूद करत आता देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा आज पंतप्रधान मोदी यांनी केली.

कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. याची मुदत आज अर्थात १४ एप्रिल रोजी संपत आहे. या कालावधीत पंतप्रधान सातत्याने जनतेशी संवाद साधत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून चर्चा केली. यानंतर महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, प. बंगाल, दिल्ली, तेलंगणा, तामिळनाडू या सात राज्यांनी लॉकडाऊन वाढविला. या अनुषंगाने ,महाराष्ट्रात किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. यानंतर पंतप्रधान मोदी ही १४ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता देशवासियांना संबोधीत करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ते नेमकी काय घोषणा करणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना विरूध्दची भारताची लढाई जोराने सुरू आहे. भारताने आतापर्यंत कोरोनापासून होणार्‍या हानीला कमी करण्यात यश संपादन केले आहे. जनतेने कष्ट सहन करून देशाला वाचविले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना खूप अडचणी आल्या. कुणाला खाण्याची तर कुणाला येण्या-जाण्याची अडचणी आली. अनेक जण कुटुंबापासून दूर राहिले. मात्र देशासाठी आपण एखाद्या सैनिकासारखे कर्तव्य निभावले. आपल्या संविधानात वुई द पीपल ऑफ इंडियाची ही शक्ती असून संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आपल्या सामूहिक संकल्पाच्या माध्यमातून बाबासाहेबांना खरी श्रध्दांजली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, सध्या विविध सणांचा कालावधी आहे. लॉकडाऊनमुळे आपण सर्व जणांनी ज्या प्रकारे नियमांचे पालन केले. इतक्या संयमाने सर्वांनी सण साजरे केलेत या बाबी अत्यंत प्रेरक असल्याचे सांगत त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आज संपूर्ण जगात कोरोनाची जी स्थिती आहे त्याची आपल्याला माहिती आहे. इतरांच्या तुलनेत भारताने आपल्याकडे कोरोनाच्या संक्रमणाला अटकाव केला असून आपण सर्व जण याचे सहभागीदार आणि साक्षीदार देखील आहेत. आपल्याकडे एकही रूग्ण नसतांना भारताने कोरोनाग्रस्त देशातून येणार्‍या विमानातील प्रवाशांची स्क्रीनींग केली होती. भारतातील रूग्ण १०० होत नाही तोच विदेशातून येणार्‍या सर्वांसाठी १०० दिवसांचे आयसोलेशन सुरू केले होते. सार्वजनीक स्थळे बंद करण्यात आली. कोरोनाचे ५५० रूग्ण असतांना भारताने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. आपण हा प्रकोप वाढण्याची वाट न पाहता तातडीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. यात कुणाशी तुलना करता येणार नसली तरी इतर देशांच्या तुलनेत आपण कोरोनाचा चांगला प्रतिकार केला असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

मोदी पुढे म्हणाले की, आधी अन्य देश व आपण समान पातळीवर होतो. आज मात्र इतरांकडे भारताच्या तुलनेत २५ ते ३० पटीत रूग्ण वाढले असून हजारोंचा मृत्यू झाला आहे. भारताने मात्र होलीस्टीक व इंटिग्रेटेड अ‍ॅप्रोच घेत, काही तातडीने निर्णय घेतले. अन्यथा, भारतातही भयंकर स्थिती आली असती. मात्र आपण निवडलेला मार्ग हा अतिशय योग्य होता. सोशल डिस्टन्सींग व लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून आला आहे. आर्थिक दृष्टीकोनातून हा मार्ग कठीण असला तरी भारतीयांच्या जिवापुढे याचे काही मोल नाही. मर्यादीत स्त्रोतांमध्ये भारताने ज्या पध्दतीत कोरोनाचा प्रतिकार केला याची जगभरात चर्चा आहे. राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांनीही चांगले काम केल्याबद्दल त्यांनी कौतुकोदगार काढले. तथापि, कोरानाचा प्रकोप अद्याप कमी झालेला नाही. भारताची लढाई देखील सुरूच असून यासाठी राज्यांसोबत चर्चा सुरू आहे. यातून यातून ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

दरम्यान, लॉकडाऊनबाबत पंतप्रधान पुढे म्हणाले की, आता लॉकडाऊनचे नियम कठोर होणार आहेत. २० एप्रिलपर्यंत पाहणी करून जिथे आवश्यकता असेल तिथे लॉकडाऊनमध्ये सशर्त शिथीलता देण्यात येईल. शेतकर्‍यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी काळजी घेतली जाणार आहे. तसेच लॉकडाऊनबाबत उद्या सरकारतर्फे नवीन सविस्तर नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देखील पंतप्रधानांनी दिली.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content