सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा – जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयाच्या परीसरात कोणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असतील अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकत असतील अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेत.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा मौखिक आरोग्य व तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ऑनलाईन पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद पांढरे, श्रीमती विद्या राजपूत, डॉ नितीन एस भारती, जिल्हा सल्लागार, निशा कटरे, सायकॉलॉजीस्ट, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समितीचे उपाध्यक्ष डॉ पंकज आशिया, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त योगेश बेंडकुळे, अशासकीय सदस्य नरेंद्र पाटील, डॉ गोविंद मंत्री, मुकुंद गोसावी, राज मोहम्मद खान शिकलकर, श्रीमती गोस्वामी, प्राचार्य, का ऊ कोल्हे विद्यालय, सलाम मुंबई फाऊंडेशन, पोलीस, गटविकास अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, मनपा, जळगाव, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी हे दूरचित्रवाणीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, तालुकास्तरावर तालुका तंबाखू नियंत्रण समन्वय समितीने या कार्यक्रमाबाबत बैठक आयोजित करून आपल्या तालुक्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. यासोबतच मौखिक आरोग्याची जनजागृती करताना लहान मुलांच्या दंत व मौखिक आरोग्यावर विशेष भर द्यावा. सर्व शासकीय विभाग / कार्यालय प्रमुख यांचे सोबतच पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने कोटपा कायद्यातील विविध कलमातंर्गत कारवाई करण्याचे निर्देशही दिलेत.

बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी कार्यक्रमाचे महत्त्व आणि सुरू असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली. तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था उपक्रमातील yellow line campaign करिता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत एका शाळेमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती दिली. जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ संपदा गोस्वामी यांनी मौखिक आरोग्य कार्यक्रमातील उपक्रमाचे महत्त्व व उपक्रमाबाबत सांगितले. तर जनजागृती सोबतच तंबाखू मुक्त शाळांचा उपक्रम जिल्हाभर राबवून शिक्षण विभागाच्या सहकार्यानें जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे समितीचे अशासकीय सदस्य श्री राज मोहम्मद खान शिकलकर यांनी बैठकीत सांगितले.

Protected Content