जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील सरकारी, निम-सरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, २१ एप्रिल रोजीपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या या संपामुळे राज्यभरातील प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने :
आज सकाळपासूनच राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निदर्शने सुरू केली आहेत. गेल्या अनेक काळापासून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष खदखदत होता. प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्यामुळे, अखेर आजपासून बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.

“मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही”:
आंदोलनस्थळी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा लढा मागे घेतला जाणार नाही. या संपामुळे आज पहिल्याच दिवशी शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले असून, सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक आपल्या कामांसाठी कार्यालयात येत असले तरी, कर्मचारी संपावर असल्याने त्यांना परत फिरावे लागत आहे.
येणाऱ्या काळात सरकार यावर काय तोडगा काढते आणि कर्मचाऱ्यांची मनधरणी कशी करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कर्मचाऱ्यांचा हा पवित्रा पाहता, येणारे काही दिवस प्रशासकीय कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.



