Home क्राईम संतापजनक : अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून अत्याचार !

संतापजनक : अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून अत्याचार !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडिया आणि वैयक्तिक फोटोंचा गैरवापर करून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील एका तांडा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १६ वर्षे १० महिन्यांची अल्पवयीन आहे. संशयित आरोपी रवींद्र ओंकार राठोड याने पीडित मुलीचे काही खासगी फोटो हस्तगत केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना मागील वर्षी दिवाळी सणाच्या कालावधीपासून सुरू झाली होती. आरोपीने पीडितेच्या मनात भीती निर्माण करून तिला वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

इतकेच नाही, तर पीडित मुलीचे लग्न जमल्याची माहिती मिळाल्यानंतरही संशयित आरोपीने लग्न मोडून टाकण्याची धमकी दिली आणि तिला पुन्हा भेटण्यास प्रवृत्त केले. असे असूनही इन्स्टाग्राम अकाऊंटचा वापर करून पीडितेचे बदनामीकारक फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचे मानसिक आणि शारीरिक शोषण सुरूच ठेवले होते. अखेर पीडित मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी धाडस दाखवून या प्रकाराची तक्रार चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत संशयित आरोपी रवींद्र ओंकार राठोड याच्यावर बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound