Home Cities जळगाव महिला लोकशाही दिन २० जुलैला ; जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या तक्रारींचे होणार थेट...

महिला लोकशाही दिन २० जुलैला ; जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या तक्रारींचे होणार थेट निराकरण

0
64


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समस्याग्रस्त, पीडित व गरजू महिलांना आपल्या अडचणी थेट प्रशासनापुढे मांडता याव्यात तसेच त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण होऊन न्याय मिळावा, या उद्देशाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, २० जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी ११ वाजता हा उपक्रम पार पडणार असून जिल्ह्यातील महिलांना आपल्या समस्या मांडण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

महिलांच्या हक्कांचे संरक्षण, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार, कौटुंबिक व सामाजिक प्रश्नांबाबत प्रशासनाकडून प्रभावी मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. या उपक्रमामुळे विविध विभागांशी संबंधित तक्रारी एकाच ठिकाणी मांडण्याची सुविधा महिलांना उपलब्ध होते.

यावेळी जिल्हा प्रशासनासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहून महिलांच्या तक्रारी, अर्ज व निवेदने स्वीकारतील. विविध शासकीय योजनांबाबत माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थींना मार्गदर्शन करण्यात येणार असून, शक्य त्या प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांनी आपल्या समस्या, तक्रारी किंवा मागण्या संबंधित आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देताना सांगितले की, सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.


Protected Content

Play sound