Home Cities पारोळा वीजपुरवठ्याच्या वारंवार खंडित होणाऱ्या समस्येवर ग्रामस्थ आक्रमक 

वीजपुरवठ्याच्या वारंवार खंडित होणाऱ्या समस्येवर ग्रामस्थ आक्रमक 

0
9

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावरखेडे होळ, सावखेडे मराठ आणि कुन्हरे परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. या समस्येबाबत अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी आणि नागरिकांनी आमदार अमोल पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले. तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास संबंधित वीज उपकेंद्राजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, गेल्या काही दिवसांपासून दररोज सायंकाळी सुमारे ७.३० ते रात्री ११.३० या वेळेत वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः परीक्षेच्या तयारीसाठी रात्रीचा वेळ महत्त्वाचा असताना सततच्या वीज खंडित होण्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

वीजपुरवठा खंडित होण्याचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना बसत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ऑक्सिजनच्या सहाय्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी वारंवार होणारी वीज खंडित होणे जीवितास धोकादायक ठरू शकते, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच उष्ण आणि दमट वातावरणात नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीबाबत महावितरणकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या समस्येची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

आमदार अमोल पाटील यांनाही ग्रामस्थांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली असून, प्रशासनाशी समन्वय साधून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. वीजपुरवठा नियमित झाल्यासच विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, असेही ग्रामस्थांनी नमूद केले. ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, जर लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर संबंधित वीज उपकेंद्राजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound