रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढीस लागली असून शहरी व ग्रामीण भागात सातत्याने रूग्ण आढळून येत असल्याने याची साखळी तुटली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रावेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढीस लागला आहे. तालुक्यात आजवर ६१३ रुग्ण आढळले असून ४१३ रुग्ण बरे घरी पोहचले आहे तर १५८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर ४२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील मृत्यूचे प्रमाण हे जास्त असल्याची बाब चिंताजनक आहे. खरं तर, रावेर तालुक्यात कोरोनाचा रूग्ण खूप उशीरा मिळाला होता. तालुक्यात १९ मे ला पहिला रुग्ण निघाला होता त्यामुळे दोनच महिन्यात रावेर तालुक्यातील रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून कोरोनाची साखळी तोडण्यात सपशेल अपयश आले आहे. जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव, भुसावळ, चोपडा, अमळनेर व जामनेरसह आता रावेर तालुक्यातील संसर्गाचे प्रमाण हे लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून येत आहे.