जमीन विक्री गैरव्यवहार : माजी आमदारांसह तिघांवर गुन्हा

जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुका शिक्षण संस्थेच्या मालकीची जमीन कमी किंमतीत विकून गैरव्यवहार केल्या प्रकरणी माजी आमदार आबाजी नाना पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुका शिक्षण संस्थेच्या मालकीची अंदाजे ५० लाखांची जामनेर शिवारातील २ हेक्टर ५४ आर जमीन सक्षम प्राधिकार्‍याकडून परवानगी न घेता फक्त ३ लाख रुपयांत विक्री केल्याप्रकरणी संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी सचिव, खरेदीदार अशा तिघांवर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे संचालक सुनील उर्फ माधव विठ्ठल चव्हाण (रा.बजरंग पुरा, जामनेर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ८ जानेवारी २००१ रोजी तात्कालिन अध्यक्ष आबाजी पाटील आणि तात्कालिन सचिव नारायण महाजन यांनी कोणताही अधिकार नसताना तसेच संचालकांची बैठक वा ठराव न घेता परस्पर संगनमताने संस्थेची गट क्रमांक ५६४ क्षेत्र २ हेक्टर ५४ आर ही जामनेर शिवारातील जमीन माधव देशपांडे यांना ३ लाखांत विक्री केली. याप्रकरणी फसवणूक, माहिती दडपणे व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असल्याची प्रतिक्रिया तत्कालीन सचिव नारायण महाजन यांनी केला आहे.

Protected Content