जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे २३ ते २५ एप्रिल या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडली.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी “क्रीडा विभागाच्या योजना व उपक्रम” यावर सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी, प्रा. डॉ. अशोक पवार यांनी “माहिती अधिकार अधिनियम व लोक सेवा हक्क कायदा” या महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण दिले.
तिसऱ्या दिवशी मानसोपचार तज्ञ डॉ. निरज देव यांनी “कामातील ताण-तणावाचे व्यवस्थापन” यावर मोलाचे मार्गदर्शन केले. याच दिवशी अप्पर कोषागार अधिकारी कैलास सोनार यांनी “महाराष्ट्र नागरी सेवा नियम व वित्तीय कामकाज व नियमावली” याबाबत माहिती दिली.
याशिवाय २८ एप्रिल रोजी मिलिंद बुवा यांचे “कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर” या विषयावर विशेष प्रशिक्षण सत्र होणार आहे, ज्याची उत्सुकता सर्व सहभागी कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
या प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व मानधन कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यशाळेच्या दर्जाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांमुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.