यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे ऑनलाइन पोर्टल लोकार्पण; डिजिटल माध्यमातून थेट लाभार्थ्यांशी संपर्क

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी आणि विविध योजनांचा लाभ सुलभतेने थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी विकसित केलेल्या https://itdpyawal.in/ या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजू मामा भोळे, आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक व आयुक्त श्रीमती लीना बनसोड यांचे मार्गदर्शन लाभले.

पंतप्रधानांच्या ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेचा व मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमाचा भाग म्हणून हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. याची संकल्पना यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांची असून, पोर्टलमध्ये न्यूक्लियस बजेट योजना, ठक्कर बाप्पा योजना, वनहक्क कायदा, शबरी घरकुल योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, वनधन योजना, आश्रमशाळा व वसतिगृह योजना यांचा समावेश करण्यात आला आहे.

या पोर्टलमुळे लाभार्थ्यांना प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष न जाता, विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्जाची स्थितीही पोर्टलवरून थेट कळणार आहे. यामुळे पारदर्शकता, वेळेची बचत आणि लाभ प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे.

हा उपक्रम डिजिटल युगात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Protected Content