चाळीसगाव शहरासाठी ५ कोटींच्या निधीची विशेष तरतूद

अद्ययावत व्यायामशाळा, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका, शहरातील प्रमुख चौकांचे होणार सुशोभिकरण !

चाळीसगाव प्रतिनिधी । आमदार उन्मेषदादा पाटील यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव शहरासाठी पाच कोटी रूपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातून अद्ययावत व्यायामशाळा, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका आणि शहरातील प्रमुख चौकांचे होणार सुशोभिकरण होणार आहे.

ही होणार कामे

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागातर्फे आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या शिफारसीने चाळीसगाव नगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यात शहरातील तरुणांची शरीर स्वास्थासाठी व्यायामाचे असलेले महत्व लक्षात घेत अद्ययावत व्यायामशाळा बांधकामासाठी ५० लाख इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरातील विशेषतः ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना शहरातच हक्काचे सर्व सोयीयुक्त अभ्यास केंद्र असावे हा उद्देश ठेवत सुसज्ज अश्या अभ्यासिकेसाठी ३० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

शहराच्या सौदर्यांत पडणार भर

शहराचे सौंदर्य व ओळख म्हणजे त्या त्या शहरात असणारे मुख्य चौक मात्र चाळीसगाव तालुक्यातील चौकांचे सुशोभीकरण न झाल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती, १) शहरातील मुख्य आकर्षण असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल पॉइंट) सुशोभीकरण करणे (५० लक्ष), २) धुळे व मालेगाव कडे जाणारा महाराणा प्रताप चौक सुशोभिकरण करणे (५० लक्ष), ३) शहरातील तहसील व पंचायत समिती जवळील वीर सावरकर चौक सुशोभिकरण करणे (४० लक्ष), ४) अंधशाळा चौक सुशोभिकरण करणे (३० लक्ष), ५) भडगाव रोड टाकळी प्रचा जवळील खरजई नाका चौक सुशोभिकरण करणे (३० लक्ष), ६) स्टेशन रोड पोलीस चौकी समोरील चौक सुशोभिकरण करणे (२० लक्ष) आदी ६ चौकांसाठी २ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे,

रस्त्यांसाठीही तरतूद

या निधीच्या अंतर्गत शहरातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था असलेल्या प्रभाग क्र.१ व प्रभाग क्र.१० मधील रस्त्यांच्या सुधारणेसाठी प्रत्येकी १ कोटींची भरीव तरतूद करण्यात आल्यामुळे या प्रभागांचे चित्र बदलणार आहे दरम्यान, चाळीसगाव शहराच्या इतिहासात प्रथमच विकासकामांसाठी विशेष निधी म्हणून ५ कोटी इतकी भरघोस तरतूद करण्यात आल्याबद्दल आमदार उन्मेशदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदामंत्री नामदार गिरीषभाऊ महाजन व पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे शहरवासीयांच्या वतीने आभार मानले आहेत.

Add Comment

Protected Content