चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिभा सुधाकर पाटील (वय ३९, रा. काकळणे, ता. चाळीसगाव) या मंगळवारी २१ एप्रिल दुपारी १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकावर आल्या होत्या. त्या पारोळ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, तिथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र (वजन ६ ग्रॅम) लंपास केले. चोरीचा प्रकार लक्षात येताच महिलेने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटा गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला होता.

या घटनेनंतर पीडित महिलेने त्वरित चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण जाधव हे करत आहेत. बस स्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या चोरी झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने बस स्थानक परिसरात गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



