लवकरच शिंदे यांचा रामदास आठवले होणार ! : ठाकरे गटाचा दावा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लवकरच रामदास आठवले होणार असल्याचा दावा ठाकरे गटातर्फे करण्यात आला आहे.

 

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील आजच्या रोखठोक या सदरात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लक्ष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, शिंदे यांचा रामदास आठवले होईल. हे विधान बोलके आहे,’ असे यात नमूद करण्यात आले आहे.

 

यात पुढे म्हटले आहे की, ”एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, ’शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील.” असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. अशी टीका रोखठोक सदरातून करण्यात आली आहे.

Protected Content