सामाजिक बांधिलकी! वाढदिवशी रविकांत तुपकर करणार शेतकऱ्यांसाठी उपोषण


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रविकांत तुपकर यांचा १३ मे रोजी वाढदिवस आहे, परंतु त्यांनी नेहमीप्रमाणेच कोणताही गाजावाजा न करता तो शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. तुपकर यांनी आजपर्यंत कधीही आपला वाढदिवस मोठ्या स्तरावर साजरा केला नाही. बॅनर, पोस्टरबाजी किंवा कोणताही जल्लोष टाळत ते हा दिवस नेहमीप्रमाणे सामाजिक कार्यासाठीच वापरतात. कार्यकर्त्यांनीही कोणतेही प्रदर्शन करू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

यावर्षी देशात आणि राज्यात असलेल्या गंभीर परिस्थितीमुळे तुपकरांना वाढदिवस साजरा करणे अधिकच उचित वाटत नाही. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. दुसरीकडे, राज्यात दररोज सुमारे १० शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, बँकांनी कर्जवसुली थांबवली आहे, परंतु तरीही शेतकऱ्यांवर दबाव आहे. अनेक शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित आहेत आणि एकूणच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. तरुणांमध्येही असंतोषाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे हास्यास्पद ठरेल, असे त्यांचे मत आहे.

त्यामुळे रविकांत तुपकरांनी आपल्या सर्व हितचिंतकांना विनंती केली आहे की त्यांनी कोणताही वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करू नये आणि कोणतीही पोस्टरबाजी करू नये. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, त्यांना हक्काचा पीकविमा मिळावा, शेतकरी आत्महत्या थांबाव्यात आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांना आदरांजली अर्पण करण्यासाठी रविकांत तुपकर येत्या १३ मे रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत आपल्या घराच्या अंगणात कुटुंबासोबत एक दिवसीय उपोषण करणार आहेत. या उपोषणाच्या माध्यमातून ते सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांकडे वेधणार आहेत आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहेत.

या दिवशी कोणतीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या हितचिंतकांनी या उपोषणात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा दर्शवावा, हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी भेट असेल, असे भावनिक आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.