कोयता घेवून दहशत माजवणारे दोघे अटकेत, एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मध्यवर्ती असलेल्या अजिंठा चौफुली परिसरात हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता जप्त केला असून, याप्रकरणी शनिवारी (१० मे) सायंकाळी सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अजिंठा चौफुली येथे दोन व्यक्ती कोयता घेऊन फिरत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पाटील यांनी तातडीने पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारी ४ वाजता अजिंठा चौफुली येथे सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत संशयित आरोपी उमेश भगवान जाधव (वय ३३) आणि गणेश भगवान लोहार (वय २७, दोघेही राहणार अयोध्या नगर, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शादाब सय्यद यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, सायंकाळी सात वाजता उमेश जाधव आणि गणेश लोहार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे करत आहेत.

Protected Content