यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील मेन रोडवरील प्रसिद्ध लक्ष्मी ज्वेलर्समध्ये रविवारी पहाटे चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चार अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले, मात्र आत असलेल्या चॅनल गेटमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून चोरट्यांचा चेहरा व त्यांची दुचाकीदेखील कॅमेऱ्यात दिसून आली आहे.
ही घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. नितीन दिनकर रणधीरे यांच्या मालकीचे हे सोन्या-चांदीचे दुकान मेन रोडवरील चावडीजवळ आहे. चोरट्यांनी एका दुचाकीवर येऊन शटरचे कुलूप तोडले, मात्र चैनल गेट अडथळा ठरला आणि दुकानात प्रवेश करण्यात त्यांना अपयश आले. चोरांनी वापरलेली दुचाकी एम. एच. १९ डी. एल. ९७५७ या क्रमांकाची असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे.
दुकानात चोरी करण्यात अपयश आल्यावर चोरट्यांनी याच परिसरातील कांचन श्रीराम सराफ यांच्या बंद घराकडे मोर्चा वळवला. घराचे कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला, परंतु घरात कोणतीही मौल्यवान वस्तू हाती न लागल्यामुळे तेथूनही ते रिकाम्या हाताने पळाले.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर व उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व हवालदार निलेश चौधरी यांनी पंचनामा करून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार निलेश चौधरी करीत आहेत.
या घटनेमुळे यावल शहरात खळबळ उडाली असून स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या अगोदरही याच रस्त्यावर असलेल्या एका दवाखान्यात अशाच प्रकारे चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे रात्र गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.