
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर मतदारसंघातील कुऱ्हा परिसरात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. चिचंखेडा बु., निमखेडी बु., इच्छापूर, टाकळी, महालखेडा आणि चारठाणा या गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी प्रशासनाला तातडीने मदत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

दि. १ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे परिसरातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन पडझड झालेल्या केळी बागांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताच आमदार पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या तसेच पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी तहसीलदार वखारे, कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते. आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा पंचनामा होईल याची दक्षता घेण्यास सांगितले. मदतीपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या वास्तविक नुकसानीनुसार योग्य भरपाई मिळावी, यासाठी शासन आणि विमा कंपनी स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. ऑनलाईन प्रक्रियेमधून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी हा देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत आमदार चंद्रकांत पाटील यांनी संकटाच्या या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांना योग्य मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी आणि त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.



