Home Cities जळगाव तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी ‘स्माईल’ शिष्यवृत्ती योजना सुरू ; मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी ‘स्माईल’ शिष्यवृत्ती योजना सुरू ; मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ‘स्माईल (SMILE)’ शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी १३ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असून, यासाठी राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्री-मॅट्रिक (इयत्ता ९ वी व १० वी) तसेच पोस्ट-मॅट्रिक (इयत्ता ११ वी, १२ वी, महाविद्यालयीन शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण) घेणाऱ्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शासनमान्य किंवा खासगी शाळा, महाविद्यालय तसेच विद्यापीठांमध्ये नियमित शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवरून जारी करण्यात आलेले अधिकृत ट्रान्सजेंडर आयडेंटिटी सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी निर्धारित निकषांनुसार ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक राहणार आहे. शिष्यवृत्तीसाठी उपलब्ध जागांची संख्या मर्यादित असल्यामुळे लाभार्थ्यांची निवड मागील शैक्षणिक वर्षातील गुणवत्तेनुसार (मेरिट) केली जाणार आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. तसेच शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याने संबंधित बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि इतर सविस्तर माहिती पोर्टलवर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव योगेश पाटील यांनी जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे. या योजनेमुळे तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळून त्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound