नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या त्यांच्या कार्यक्रमाद्वारे देशभरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोना, शेतकरी, खेळणी उद्योग आदी विविध मुद्यांवर भाष्य केलं. परंतु, सध्या देशातील राजकारण ज्या गोष्टीवरून तापल्याचे दिसत आहे. त्या जेईई व नीट या परीक्षांच्या संदर्भात काहीच भाष्य केले नाही. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर ट्विट करत निशाणा साधला आहे.
”पंतप्रधानांनी ‘परीक्षेवर चर्चा’ करावी असं ‘जेईई-नीट’च्या परीक्षार्थींना वाटत होतं. मात्र, पंतप्रधानांनी केली ‘खेळण्यांवर चर्चा’.” अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट आणि जेईई परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि त्यांनी सहमती दर्शवल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा असा सल्ला केंद्र सरकारला या अगोदर दिलेला आहे.
सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करत उपाय शोधला पाहिजे असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं होतं. तुम्ही आधीच करायचं तेवढं नुकसान केलं आहे. आता तरी देशातील विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐका अशी विनंतीही त्यांनी सरकारला केली होती.