आगे आगे देखो…होता है क्या ? : आ. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया !

जळगाव प्रतिनिधी | राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला असून ही तर अजून सुरूवात असून पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.

उच्च न्यायालयाने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिल्यामुळे सरकारची नाचक्की होऊन देशमुख यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन म्हणाले की, राज्यातील सरकारला जनतेशी काही देणेघेणे नसून हे वसुली सरकार आहे. एका साध्या एपीआयला १०० कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी ही मागणी केली होती. मात्र निगरगट्ट ठाकरे सरकारने त्यांची पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. तथापि, कोर्टाच्या दणक्याने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.

अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. मात्र जे काही समोर आलेय ते फक्त हिमनाच्या टोकाप्रमाणे आहे. म्हणजेच अजून बरेच काही समोर येणार आहे. या मंडळीने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे. अजून पुढे बघा…काय होते ते ? असे आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी म्हटले आहे.

Protected Content