Home Cities पारोळा पारोळ्यात मतदान विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाचा आढावा

पारोळ्यात मतदान विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाचा आढावा

0
5

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या मतदान विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पारोळा नगरपरिषदेच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ३० जून ते २९ जुलै या कालावधीत सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. उल्हास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील, शहर तलाठी निशिकांत माने, प्रशासकीय अधिकारी श्रीमती यामिनी लक्ष्मणसा जटे, नगरसेवक मनिष पाटील, दीपक अनुष्ठान, अमोल शिरोळे, भावडू राजपूत, भूषण टिपरे, धीरज महाजन, विनोद पाटील, विवेक पाटील, इम्रान शेख सलीम, नजीर खान बेलदार, दगडू पवार, मंगलाबाई सुदाम चौधरी, कार्यालय अधीक्षक अनिल तिदमे, वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर रिजल तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किरण विसावे, निर्मल दूधवे, रवींद्र ठाकरे, विशाल गायकवाड आणि सचिन चौधरी उपस्थित होते.

बैठकीत मतदान विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी आवश्यक नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी शहरातील मतदान यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम विहित कालावधीत शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन केले. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहरातील सर्व प्रभागांतून या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रीय महत्त्वाच्या या उपक्रमासाठी नागरिक, सामाजिक संस्था, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व घटकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीदरम्यान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत उद्भवणाऱ्या विविध अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून त्या अडचणींवर योग्य तो मार्ग काढण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आगामी काळात पुनर्निरीक्षण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन यांनी केले. यावेळी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी मतदान विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound