Home क्राईम चोपड्यात प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर पोलिसांची कारवाई

चोपड्यात प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर पोलिसांची कारवाई

0
7

चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि चोपडा शहर पोलिसांनी कारवाई करत एका विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची साठवणूक, वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे (वय ३०) यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक २९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात फिरोज हुसेन बागवान (वय ३९, रा. दर्गाअली, आझाद चौक, चोपडा) याला आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास चोपडा शहरातील भाजी मंडी परिसरातील रॉयल फ्रुट सप्लायर्स दुकानासमोर ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान आरोपीकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध प्रकारच्या पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.

कारवाईत विमल पान मसाला, करमचंद पान मसाला, तानसेन पान मसाला तसेच व्ही-१ सुगंधित तंबाखू असा एकूण १२३ पाऊच व पाकिटांचा साठा जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित माल विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्न सुरक्षा आयुक्तांनी १६ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या शासन राजपत्रातील आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांनी केले. पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Protected Content

Play sound