आरोप करण्यापेक्षा रेमडेसिवीर उपलब्ध करून द्या- बाविस्कर

जामनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड यांनी केलेल्या टिकेला उत्तर देतांना भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी आरोप करण्यापेक्षा रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा टोला मारत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

सध्या कोरोनाचा कहर सुरू असतांनाही आमदार गिरीश महाजन हे बंगालमध्ये प्रचाराला नव्हे इव्हीएम हॅकींगसाठी टीम घेऊन गेलेत. तर त्यांचे कार्यकर्ते रेमडेसिवीरचा उघड काळाबाजार करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे स्थानिक नेते संजय गरूड यांनी सोमवारी जामनेर येथे पत्रकार परिषदेत केला आहे.

दरम्यान, संजय गरूड यांच्या आरोपांना चंद्रकांत बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, राज्यातच नव्हे तर देशभरात आमदार गिरीश महाजन यांचा आरोग्य सेवेक म्हणून नावलौकीक आहे. आज आघाडी सरकार सत्तेत आहे. तालुक्यातील आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी आमचे नेते आमदार गिरीश महाजन यांचेवर आरोप करण्यापेक्षा तालुक्यातील जनतेसाठी सत्तेचा फायदा करून दिल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू.

बाविस्कर पुढे म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी राजकारणात मशगुल आहेत. आमदार गिरीश महाजन व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वर्षभरापासून रूग्णांना सेवा पुरवली. तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात फक्त जी.एम.फाऊंडेशनच्याच रूग्णवाहिका होत्या. रेमडेसिवीरचा काळाबाजार करत असल्याचे स्पष्ट करून दिल्यास राजकारणातून संन्यास घेऊ. आरोप करण्यापेक्षा पालकमंत्र्यांकडून इंजेक्शन उपलब्ध करून द्या अशी मागणी त्यांनी केली. तर, बीओटी व्यापारी संकूल नसते तर शहराचा चेहरा बदलला नसता. नवीन बांधलेल्या उर्दू शाळेवरून गरूड हे राजकारण करत असल्याचे बाविस्कर म्हणाले.

Protected Content