अक्षय कुमारचा त्र्यंबकेश्वर हवाई दौरा वादाच्या भोवऱ्यात ; भुजबळांकडून चौकशीचे आदेश


नाशिक (वृत्तसंस्था)
सध्या सगळे मंत्री, व्हीआयपी हे कारने प्रवास करत आहेत. तरीही, अक्षयकुमारला हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास परवानगी कोणी दिली?, सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वच हॉटेल्स अन् रिसॉर्ट बंद असतानाही, अक्षयसाठी तारांकीत रिसॉर्टचे दरवाजे कसे उघडण्यात आले, येथे अक्षयकुमारचा पाहुणचार कसा झाला? आदी प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गाव या भागात अभिनेता अक्षय कुमारचा दौरा आता चांगलाच वादात सापडला आहे. कारण अक्षयकुमारच्या या वैयक्तिक दौऱ्याबाबत जिल्हा प्रशासन कुठलीही माहिती नव्हती. येथील एका शैक्षणिक संस्थेच्या हेलिपॅडवर अक्षयकुमारच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले होते. विशेष म्हणजे नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अक्षय कुमारचे स्वागतही करण्यात आले होते. अगदी अंजनेरी शिवारात फिरताना त्याच्या सुरक्षेसाठी एक्स्कॉर्टही पुरविण्यात आला होता. यावरच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाचे चांगलेच कान ओढले आहेत. अक्षयच्या अंजनेरी शिवारात फिरताना अक्षयकुमारच्या सुरक्षेसाठी एक्स्कॉर्टही पुरविण्यात आला. मग, शहराच्या पोलिसांनी जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत प्रवेश कसा केला?, याशिवाय एक्स्कॉर्ट का पुरवला ? असा प्रश्न पालकंमत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित करत त्यामुळे अक्षयकुमारच्या संपूर्ण दौऱ्याच्या चौकशीचे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.

Protected Content